गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त   

गडचिरोली : महाराष्ट्राच्या गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा एक तळ सुरक्षा दलाने उद्ध्वस्त केला. तसेच, घटनास्थळावरुन शस्त्रे, स्फोटके, जिवंत काडतुसे, डेशोनेटर आणि नक्षलवादी साहित्य जप्त केले. सध्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे, असे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक कार्यालयाने सांगितले.
 
छत्तीसगढच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोलीत सुरक्षा दलाची नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. ही चकमक तीन ठिकाणी सुमारे तीन तास चालली. नक्षलवाद्यांच्या भामरागड दलाने छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील गडचिरोलीच्या कवंडे येथील पादचारी पुलाजवळ तळ उभारला होता. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने रविवारी दुपारी नक्षलविरोधी मोहीम हाती घेतली होती.
 
यामध्ये विशेष पोलिस युनिट सी-६० च्या सुमारे २०० कमांडोंचा समावेश होता. काल सकाळी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकावर गोळीबार सुरू केला. त्यास सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर दिले. सुमारे तीन तास चकमक सुरू होती. या कारवाईत नक्षलवाद्यांचा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला. या चकमकीत अनेक नक्षलवादी ठार किंवा जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे.
 

Related Articles